आयपीएस अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर, तपास सुरू
मुंबई. कोरोनाचा फैलाव आणि लॉकडाउन दरम्यान एका उच्च अधिकाऱ्याकडून निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) म्हणून तैनात आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवन आणि धीरज वाधवन यांच्या परिवारासाठी आपत्कालीन पास जारी केला. या पासच्या आधारे बुधवारी वाधवन कुटुंबातील 23 लोक 5 वाहनांमधून मुंबईपासून 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या महाबळेश्वर येथील त्यांच्या फार्महाऊसवर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत गार्ड आणि स्वयंपाकी देखील होते. निष्काळजीपणा केल्यामुळे आयपीएस गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी म्हटले की, वाधवन कुटुंबातील 23 सदस्य महाबळेश्वर येथे कसे पोहोचले याची चौकशी केली जाईल. देशमुख यांनी ट्विट केले की, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्य सचिव गुप्ता यांच्याविरोधात चौकशी सुरु असेपर्यंत त्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे.'
अमिताभ गुप्ता यांच्या अधिकृत पत्रात लिहिले होते की, "संबंधित व्यक्तीला मी चांगल्याप्रकारे ओळखतो. कारण ते माझे कौटुंबिक मित्र आहेत आणि कुटुंबातील आणीबाणीमुळे ते खंडाळा येथून महाबळेश्वरला जात आहेत." या पत्रात 5 वाहनांचा तपशील देण्यात आला होता. दरम्यान गुप्ता यांच्या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण सरकार सर्व लोकांना घरीच राहण्याचा सल्ला देत आहे.
क्वारंटाइन संपल्यानंतर सीबीआय करणार कारवाई
कपिल आणि धीरज वाधवन यांच्याविरोधात सीबीआयने लुकआऊट नोटीस बजावली होती. वाधवन बंधू येस बँक आणि डीएचएफएल फसवणूकीच्या प्रकरणात आरोपी आहेत. सध्या त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांचा क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर सीबीआय त्यांना ताब्यात घेऊ शकते.