वीजबिल भरा ऑनलाईन! मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांचे आवाहन  


कल्याण: लॉकडाऊनच्या पार्शवभूमीवर महावितरणकडून मीटर रिडींग आणि वीजबिलाचे वितरण बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कल्याण परिमंडलातील वीज ग्राहकांनी महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या विविध पर्यायांचा वापर करून वीजबिलाचा भरणा ऑनलाईन करावा तसेच वीज व बिलासंदर्भात सर्व माहिती मिळविण्यासाठी आपल्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.


मीटर रिडींग बंद असल्याने ग्राहकांनी स्वतःच मोबाईल अँपच्या माध्यमातून मीटरचा फोटो काढून रिडींग सबमिट करावे, याबाबत नोंदणीकृत मोबाईलवर 'एसएमएस'द्वारे सूचित करण्यात आले आहे. हा संदेश प्राप्त झालेल्या ग्राहकांनी त्यांचे मीटर रिडींग मोबाईल अँपद्वारे सबमिट करावे. इतर ग्राहकांना सरासरी वीजबिल आकारण्यात येणार आहे. वीजबिलाचे वितरण बंद असल्याने ग्राहकांनी महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ, मोबाईल अँप व विविध पर्यायांचा उपयोग करून ऑनलाईन वीजबिल भरावे. संकेतस्थळावर केवळ ग्राहक क्रमांक नमूद करून वीजबिल भरण्याची सुविधा आहे. कल्याण परिमंडलात मार्च महिन्यात १० लाख २५ हजार ग्राहकांनी त्यांच्या १६४ कोटी ३९ लाख रुपयांच्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा केला आहे. तर एप्रिल महिन्यात पहिल्या आठवड्यात जवळपास दीड लाख ग्राहकांनी १५ कोटी ५० लाख रुपयांचा वीजबिल भरणा ऑनलाईन केला आहे. डिजिटल माध्यमातून वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी केले आहे.
---------------
असा नोंदवा मोबाईल क्रमांक
नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून MREG नंतर स्पेस द्यावा व त्यानंतर आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करून ९९३०३९९३०३ या क्रमांकावर 'एसएमएस' पाठवावा. या एका 'एसएमएस'वरून ग्राहकाच्या मोबाईलची नोंदणी होते. याशिवाय महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ किंवा मोबाईल अँपवरूनही मोबाईलची नोंदणी करता येते. नोंदणीकृत मोबाईलवर वीज पुरवठा व बिलासंदर्भात सर्व माहिती देण्यात येते.