मुंबई: लॉकडाऊन सुरू असल्यापासून मुंबईतील क्राइम रेट ६५ टक्क्यांनी घटला आहे. हत्या, विनयभंग आणि चोरीसारखे नेहमी घडणारे गुन्हे अत्यंत कमी झाले आहेत. त्यामुळे पोलिसांवरील नेहमीचा ताण कमी झाला आहे. मात्र, असे असले तरी लॉकडाऊनच्या नियमांचं भंग केल्याचे गुन्हे वाढले आहेत.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मार्चमधील मुंबईतील गुन्हेगारी ६५ टक्क्याने घटली आहे. मार्च महिन्यात केवळ ११०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घरफोडीच्या घटना शून्यावर आल्या आहेत. लोक घरातच बसून असल्याने घरफोडी आणि चोरीच्या घटना कमी झाल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या शिवाय भांडण आणि हत्यांचं प्रमाणही घटलं आहे. मात्र असं असलं तरी आम्ही गंभीर गुन्ह्यांकडे लक्ष ठेवून आहोत, असं पोलिसांनी सांगितलं. चोरी, हत्येचे गुन्हे कमी झाले असले तरी लॉकडाऊनच्या नियमांचे गुन्हे मात्र वाढले आहेत. लॉकडाऊनचा नियमभंग करणाऱ्यांवर भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोकांनी घराबाहेर पडू नये आणि स्वत:च्या आरोग्याची काळजी स्वत:च घ्यावी, असं आवाहनही पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यातील रस्ते अपघताचं प्रमाणही कमी झालं आहे. रस्त्यांवर वाहनेच नसल्याने रस्ते अपघाताचं प्रमाण १ ते दीड टक्क्यावर आलं आहे. त्याशिवाय रेल्वेत रोज दहा लोकांचा मृत्यू व्हायचा. महिन्याला किमान ३५० लोक रेल्वेतून पडून मृत्यूमुखी पडायचे. मात्र, रेल्वे बंद असल्याने रेल्वे अपघात किंवा रेल्वेतून पडून होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण थांबलं असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
मुंबईतील क्राइम रेट ६५ टक्क्यांनी घटला; लॉकडाऊनचे गुन्हे वाढले